छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट हायवाने दुचाकीने बांधकाम साईडवर निघालेल्या मजुराला जोरात धडक दिली. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बाळापूर फाट्यासमोर बीडबायपासवर शनिवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. उमेश नानकराम पाटील (वय २८, मूळ रा. रोहानी पूर्वी निमाड मध्यप्रदेश, ह. मु. गुरू लॉन्समागे बीडबायपास एशियाड कॉलनी) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
बांधकाम ठेकेदार अरुण हिरालाल राठोड (वय ३०, रा. एशियाड कॉलनी) यांच्याकडे उमेश पाटील बिगारी म्हणून आठ महिन्यांपासून काम करतो. तो त्यांचा शेजारीही आहे. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास उमेश याला राठोड यांनी झाल्टा फाटा येथील बांधकाम साईडवर कामाला जाण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलीने (MH20 FL0961) पाठवले. तो बराच वेळ झाला तरी पोहोचला नसल्याने राठोड यांनी त्याच्या मोबाइलवर कॉल केला असता एका व्यक्तीने कॉल उचलला.
त्याने सांगितले, की बाळापूर फाट्यासमोर नवीन हेडगेवार हॉस्पिटलचे काम चालू आहे त्या समोरील बीडबायपासवर उमेशला हायवाने (MH20 CT7523) उडवले आहे. राठोड यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. तिथे उमेश मृतावस्थेत पडलेला होता आणि बाजूलाच चक्काचूर झालेली मोटारसायकलही पडलेली होती. उमेशला रिक्षाने घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी हायवाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहेत.