पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : कोळीबोडखा (ता. पैठण) येथील ग्रामपंचायत सदस्य देविदास मगरे यांनी कमालच केली. तिसरे अपत्य जन्माला आल्याने सदस्यत्व जाण्याच्या भीतीने त्यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टरांना हाताशी धरून चक्क प्रसुती झालेल्या पत्नीच्या नावातच खाडाखोड केली. मिनाक्षी देविदास मगरे ऐवजी लक्ष्मी कैलास पोटफोडे असे केले आणि रहिवासी दाखवले गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनचे. दिनेश कल्याण मगरे यांनी माहिती अधिकारात संपूर्ण माहिती मागवली आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या सहाही जणांविरुद्ध पाचोड पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी (२२ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोळीबोडखाचे ग्रामपंचायत सदस्य देविदास दुर्योधन मगरे (वय ३७), त्यांची पत्नी मीनाक्षी देविदास मगरे (वय ३५, रा. कोळीबोडखा), देविदास मगरे यांचा मेव्हणा कैलास सुदाम पोटफोडे (वय ४५, रा. राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड), पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक सुधीर पोहरेगावकर (वय ५९), डॉ. शिवाजी भोजने (वय ४२), श्रीमती मिसाळ (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कशी केली बनवाबनवी…
पाचोड ग्रामीण रुग्णालयात सौ. मीनाक्षी मगरे यांची प्रसुती झाली. मात्र हे देविदास मगरे यांचे तिसरे अपत्य असल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व जाण्याची भीती त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांना हाताशी धरून प्रसुती झालेल्या महिलेच्या नावात खाडाखोड केली. मीनाक्षी यांच्या नावाऐवजी लक्ष्मी कैलास पोटफोडे असे केले. शासकीय रजिस्टरमध्ये खाडाखोड करून नवीन मजकुराची बनावट नोंद करणे शासनाची फसवणूक आहे. या प्रकरणाची तक्रार दिनेश कल्याण मगरे यांनी केली. तक्रार केल्याने दिनेश मगरे यांना देविदास मगरे आणि त्यांच्या साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संपूर्ण गोलमाल समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.