छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : वाढते तापमान, पाणी टंचाई, नद्यांचे प्रदुषण यासारख्या पर्यावरणीय समस्या ह्या आपल्या गावा, घरापर्यंत पोहोचल्या आहेत. लवकर उपाय केला नाहीतर आपणा साऱ्यांनाच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावच्या, परिसराच्या, भवतालच्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपल्यापरीने पार पाडली पाहिजे. पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊनच सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे,अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज नायगाव येथील ग्रामस्थांना संबोधित केले.
‘गाव तेथे वड’ या अभियानाचा प्रारंभ आज जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीतील नायगाव येथे करण्यात आला. सरपंच योगिता अरगड, विभागीय वनअधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे, उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, रामदास दौंड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, तहसिलदार सतीश सोनी, इको सत्व संस्थेच्या नताशा जरीन, अनुपमा नंदनवारकर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या प्रवेशद्वारापासून खाम नदीपर्यंत वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्यात अभंग गायन व वृक्ष लागवडीच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते खाम नदी जलपूजन व नंतर वडाचे रोप लावून वड लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. आपण प्रत्येकाने आपल्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जरी जमिनीत जिरवले तरी आपल्याला टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी जलसमृद्ध गाव अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावकऱ्याने त्यात आपले योगदान द्यावे. गाव परिसराचा परिसर सुंदर, आल्हाददायक व आरोग्यदायी करण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन केले पाहिजे. गावातून वाहणारी नदी स्वच्छ, प्रदुषण मुक्त ठेवणे हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून व एकजुटीने प्रयत्न करायला हवे,असेही त्यांनी सांगितले. खाम नदी पुनरुज्जीवन अभियानातही सर्व गावकऱ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्ह्यात आज एकाच वेळी सर्व गावांमध्ये वड लागवड करण्यात आली. प्रत्येक गावात सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, तहसिल कार्यालयांच्या समन्वयातून वडाची रोपे पोहोचविण्यात आली व सकाळी ९ वाजेपासून सगळीकडे ही रोपे लावण्यात आली.