बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अनेकदा तिला घरातील सदस्यांच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटते. विशेष करून जेव्हा तिची धाकटी बहीण रात्री ११ ला घरी येते. तोपर्यंज तिला काळजी लागून राहते, असे भूमीने म्हटले आहे.

भूमी मेरे हसबंड की बीवी या चित्रपटामुळे चर्चेत असून, सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत तिने महिलांवरील हिंसाचाराबद्दल उघडपणे भाष्य केले. प्रसारमाध्यमांत बलात्कार आणि महिलांशी संबंधित बातम्यांना देण्यात येणाऱ्या स्थानावरही तिने आक्षेप घेतला. हे रोज घडणारे आहे, त्यामुळे पहिल्या पानावर स्थान कशासाठी, असे मत तिने व्यक्त केले. २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या मेरे हसबंड की बीवी या चित्रपटाव्यतिरिक्त, भूमी पेडणेकर दलदल या वेब सिरीजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ती मुंबईच्या डीसीपी रीता फरेरा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांची कहानी दाखवली जाईल. मेरे हसबंड की बीवी चित्रपटात भूमीसोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या भूमिका आहेत. मात्र गेल्या ३ दिवसांतील या चित्रपटाची कमाई अत्यंत निराशाजनक आहे. ३५ वर्षीय भूमी पेडणेकर मूळची कोकणातील असून, तिचे वडील सतीश पेडणेकर माजी महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेले आहेत. तिने २०१४ साली आलेल्या दम लगा के हैशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड, स्क्रीन अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड मिळाला होता.
भूमीने सांगितला लहानपणीचा कटू अनुभव…
वयाच्या १४ व्या वर्षी एका अनोळख्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने भूमीला स्पर्श केला होता अन् या गोष्टीचा तिच्या मनावर चांगलाच खोलवर परिणाम झाला. मुलाखतीदरम्यान भूमीने त्या आठवणीबद्दल खुलासा केला आहे. भूमी म्हणाली, की मला अजूनही हे स्पष्टपणे आठवतंय. बांद्रा येथील परिसरात या गोष्टी तेव्हा वरचेवर घडायच्या. मी तेव्हा जवळपास १४ वर्षांची असेन. मी गर्दीत चालत होते अन् मागून कुणीतरी माझ्या पार्श्वभागावर चिमटे काढत होतं. मी मागे वळून पाहिलं पण हे कोण करतंय ते मला कळत नव्हतं, कारण तिथे खूप गर्दी होती. सतत कुणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत होतं अन् मी त्यामुळे अस्वस्थ झाले होते. त्यावेळी माझ्या सोसायटीमधील इतरही बरीच मुलं होती. त्यामुळे मी त्या घटनेबद्दल कुणालाच सांगू शकले नाही. पण मला नेमकं कसं वाटत होतं हे मी अद्यापही विसरलेले नाही. त्याक्षणी आपण फार घाबरलेले असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाही, कारण आपल्याबरोबर जे काही घडतंय ते पटवून घ्यायलाच वेळ लागतो.