छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्यांनी प्रेम केलं. निभावलं, लग्नही केलं. दोन वेगळ्या धर्माचे तरीही त्यांचे प्रेम यशस्वी राहिले. दोघांच्या संसाररुपी वेलीवर दोन्ही फुले उमलली. मुलीचे लग्न झाले, पण मुलाचे लग्न करताना निवड चुकली. तिच्या डोक्यात धर्म भिनलेला होता. तिला आपण आंतरधर्मीय घरात लग्न केल्याचे कळताच तिने जे केलं, ते सर्व धक्कादायक आहे.
या प्रकरणात ५४ वर्षीय महिलेने गुरुवारी (२० फेब्रुवारी) जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्या गारखेडा परिसरातील इंदिरानगरात मुलासोबत राहतात. त्यांचा मुलगा मोबाइल दुकानात काम करतो. त्यांचे पती २००५ साली वारले आहेत. पती हयात असताना त्यांनी इंदिरानगरात घर घेतलेले आहे. पती मुस्लिम तर त्या हिंदू अनुसूचित जातीच्या आहेत. पतीपासून त्यांना दोन अपत्ये झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. ११ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी मुलाचे लग्न मुस्लिम समाजातील मुलीशी लावले.
लग्नसंबंध जोडण्यावेळी मुलगी व मुलीच्या कुटुंबीयांना आंतरधर्मीय विवाहाबाबत कल्पना देण्यात आली होती, असे तक्रारीत महिलेने म्हटले आहे. मात्र लग्नानंतर सुनेला आताच कळले अशा अविभार्वात ती महिला आणि तिच्या मुलाकडे हीन दृष्टीकोनातून पाहू लागली. तिची वागणूक बदलली. ती कधी माहेरी तर कधी सासरी राहू लागली. तुम्ही लोकांनी मला फसविले, मला तुझ्यासोबत नांदायचे नाही, असे म्हणून ती पतीला शारीरिक सुखापासून दूर ठेवू लागली. मात्र पतीने विनवण्या केल्यानंतर ती शांत होत होती. यातूनच तिला मुलगा झाला, तो आता सहा महिन्यांचा आहे.
परडी फेकून दिली…
एकेदिवशी सुनेने महिला घरी असताना देवीची परडी जाणीवपूर्वक फेकून दिली व म्हणाली की, तुझी परडी मी फेकून दिली आहे. तू आता घरातून निघ, असे म्हणून तिने महिलेला घरातून हाकलून दिले. त्यानंतर महिला लेकीकडे राहायला गेली. कालांतराने मुलगा पुन्हा आईला घरी घेऊन आला असता सुनेने तिच्या आईला कॉल करून बोलावून घेतले. सुनेची आई, भाऊ, बहीण व त्यांच्या आसपास राहत असलेले गुंड लोकांना बोलावून घेऊन महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. मुलगा आणि लेकीला आईला मारहाण होत असल्याचे कळताच ते धावून आले असता त्यांनाही सुनेच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर सून घर सोडून गेली तशी परतली नाही. मात्र तिच्या घरचे लोक माझ्या मुलाला, मुलीला आणि मला जीवंत मारण्याच्या धमक्या देत आहेत, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सून आणि तिच्या ४ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील करत आहेत.