छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाला सध्या राज्यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छावा चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केले असल्याचा आरोप केला आहे. काही प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भानुसे यांनी म्हटले आहे, की छावा चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली गेली आहे. चुकीच्या गोष्टी दाखवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सोयराबाई यांनीच औरंगजेबाचा मुलगा अकबरला पत्र लिहून संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान केल्याचे दाखवले, मात्र हे खोटे आहे. अनाजी पंत आणि सहकाऱ्यांनी हे काम केलं, हे स्पष्टीकरण येणे गरजेचं होतं. सिंह आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात कधीच लढाई झालेली नाही. काल्पनिक दाखवलं गेलं आहे. संभाजीराजेंचे मेहुणे गनोजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिल्याचंही चुकीचं दाखवल्याचा दावा भानुसे यांनी केला आहे. कारण इतिहासात तशी नोंदच नाही. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्याच दरबारातील रंगनाथ स्वामी यांनी पकडून दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. ते दाखवणे गरजेचे होते. चुकीचा व खोटा इतिहास नवीन पिढीसमोर नेऊन नेरेटिव्ह सेट केला जातोय की स्वराज्याचे दुश्मन गणोजी शिर्के होते. हे चुकीचे आहे, असे भानसे म्हणाले.