छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आज, १० जुलैला सकाळी ०७:१५ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी, पिसादेवी, कांचनवाडीसह इतरही काही भागांसह जिल्ह्यातील घारेगाव, एकतुनी, फारोळा, पांढरी पिंपळगाव, पिंप्री राजा, आडगाव खुर्द, पाचोड, विहामांडवा येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली येथील संत नामदेवनगर हिंगोली येथे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगरपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
फॅन अचानक बंद पडल्यानंतरच्या सारखे होते, असे काही नागरिकांनी सांगितले. भूकंपाचे धक्के जाणवताच हिंगोली शहरातील नागरिकांनी घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर धावपळ सुरू केली. हिंगोली किंवा मराठवाडाभर कुठेही मोठे नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याचे आमचे जालन्याचे विशेष प्रतिनिधी अरविंद देशमुख यांनी कळवले.
दरम्यान, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौम्य स्वरुपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित वा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती दिली. शासनाने भूकंपाची गंभीर नोंद घेतली असून, संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे व नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूकंप व नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे श्री. पवार यांनी विधानसभेत सांगितले.