निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूरने बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या वेळी वडील शेखर कपूर भावुक झाले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढत्या वयाबद्दल सुंदर गोष्टी सांगितल्या…
कावेरीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एक क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करत शेखर कपूर यांनी कॅप्शनमध्ये मन मोकळे केले. त्यांनी लिहिले, की कावेरी काही काळापूर्वीपर्यंत फक्त लहान होती. ती कधी मोठी झाली हे मला कळलेही नाही. कदाचित एक वडील म्हणून मी ते स्वीकारू शकलो नाही. कुणाल कोहली दिग्दर्शित बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरीमध्ये कावेरीसोबत अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी मुख्य भूमिकेत आहे. अलिकडेच कावेरी कपूरने तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितले. ती म्हणाली, की प्रेमकथेवरील चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.

कुणाल कोहली यांनी कामाच्या वेळी मला फक्त साथ दिली नाही तर मार्गही दाखवला. यामुळे कलाकार म्हणून माझा मार्ग आणि प्रवास सोपा झाला. त्यांचा सल्ला मला माझ्या कारकिर्दीत पुढे नेण्यास मदत करेल. तिच्या सहकलाकार वर्धन पुरीचे कौतुक करताना कावेरी कपूर म्हणाली, की चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात वर्धन आणि मी चांगले मित्र झालो आणि अभिनेता म्हणून पदार्पण करताना मला आलेल्या काही आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याने मला मदत केली. कावेरी कपूर म्हणाली, की या चित्रपटात काम करताना मला खूप मजा आली. जेव्हा आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले तेव्हा मला खूप वाईट वाटले. या संपूर्ण अनुभवाबद्दल मी खूप आभारी आहे, यामुळे माझ्या आयुष्याची दिशा बदलली, असे ती म्हणाली.
डिस्ने प्लस हॉटस्टारवर ११ फेब्रुवारी रोजी प्रीमियर
बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी हा चित्रपट बॉबी (कावेरी कपूर) आणि ऋषी (वर्धन पुरी) यांच्या प्रेमावर आणि प्रेमातील कठीण प्रवासावर आधारित आहे. बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरीचा प्रीमियर ११ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर झाला.