छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलगी झाली म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन २१ वर्षीय विवाहितेचा पती व सासरच्यांनी छळ मांडला. घरातून हाकलून दिले. विवाहिता वर्षभरापासून माहेरी राहते. विनंत्या करूनही नांदवायला नेत नसल्याने अखेर तिने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (८ जुलै) पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील २१ वर्षीय तरुणीचे लग्न नारेगावच्या शिवाजी पुतळ्याजवळ जोशी गल्लीतील २७ वर्षीय तरुणासोबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. तिचे वडील चहा-नाश्त्याची हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सासरच्यांनी तिला पाच- सहा महिने चांगली वागणूक दिली. नंतर लग्नाच्या एक वर्षाच्या आत तिला मुलगी झाली. तेव्हा सासू, भाया व जाऊ यांनी मुलगी झाली म्हणून वाईट वागणूक द्यायला सुरुवात केली.
मुलगीच झाली, मुलगा झाला नाही असे म्हणून विवाहितेला त्रास देत तिच्याविरुद्ध तिच्या नवऱ्याला काहीतरी सांगून मारहाण करण्यास सांगायचे. त्यांचे ऐकून नवरा तिला मारहाण करायचा. तिच्यावर कुणालातरी बोलते असा संशय नवरा घ्यायचा. त्यानंतर सासू, भाया व नवरा हे आपल्याला घर बांधायचे आहे. तू तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. अपमानास्पद वागणूक देऊन तिला घरातून काढून दिले. वर्षभरापासून ती माहेरी राहत आहे. अखेर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शांतीलाल जसवाल करत आहेत.