छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय विवाहितेला त्रास देऊन छेड काढणाऱ्या तरुणाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश राजपूत (रा. वाळूज) असे संशयिताचे नाव आहे. रविवारी (७ जुलै) सकाळी वाळूज एमआयडीसीतील कमळापूर येथे घडली.
पीडित विवाहिता ही पती व दोन मुलांसह कमळापूरमध्ये राहते. ७ वर्षांपूर्वी त्यांनी किशोर म्हस्के या बिल्डरकडून घर खरेदी केले होते. बिल्डरकडे मंगेश राजपूत (रा. वाळूज) सुपरवायझर आहे. तो पीडितेच्या घराजवळच राहतो. काही दिवसांपासून तो विवाहितेवर वाईट नजर ठेवून आहे. ती प्रतिसाद देत नसल्याने तो तिच्या कुटुंबीयांसमवेत विनाकारण वाद उकरून काढून शिवीगाळ करतो.
रविवारी सकाळी पीडिता किराणा दुकानात जात होती, तेव्हा मंगेशने तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात गाठले व अश्लील चाळे केले. तू मला जेलमध्ये पाठवले तरी तुला त्रास देणारच, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत विवाहितेने म्हटले आहे. महिनाभरापूर्वीही मंगेशने तिची छेड काढली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार राम तांदळे करत आहेत.