छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात लुटमारीच्या घटना आता कधीही आणि कुठेही घडत आहेत. एक व्यापारी सार्वजनिक मुतारीत लघुशंका करत असताना बाजूलाच लघुशंका करत असलेल्या तरुणाने त्यांची गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. सुदैवाने व्यापाऱ्याने सतर्कता दाखवत चैन पकडून ठेवल्याने चोरटा अर्धाच तुकडा नेऊ शकला. ही घटना जिल्हा परिषद मैदानासमोरील मनपाच्या मुतारीत घडली.
फॅब्रीकेशन दुकानाचे मालक सुनिलकुमार गिरधारीलाल चांदवाणी (वय ५१, द वीनस लोटस अपार्टमेंट, बीडबायपास) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी साडेबाराला ते आणि त्यांची पत्नी पैठण गेटला आले होते. तिथे मोबाइल रिपेअर केला व गुलमंडी येथे खरेदी करून घरी जाताना दुपारी सव्वाला लघुशंका आल्याने जिल्हा परिषद मैदानासमोरील मनपाच्या सार्वजनिक मुतारीत ते गेले. मुतारीत आधीच असलेल्या एका अनोळखी तरुणाने (अंदाजे २० ते २५) चांदवाणी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहिली आणि अचानकपणे सोन्याची चेन जोराने ओढली.
चांदवाणी यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गळ्यातील सोन्याची चेन तुटली. त्यातील एक तुकडा अनोळखी तरुण तोऊन घेऊन पळून गेला. सोन्याची अर्धी चेन व रुद्राक्षचे पॅन्डल गोल सोन्याने राऊन्ड असलेले चांदवाणी यांच्या हातात राहिले. तरुणाने नेलेल्या सोन्याची किंमत ३० हजार रुपये (५ ग्रॅम) आहे. चांदवाणी यांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील करत आहेत.