छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्मार्ट सिटी बसच्या तिकीट शुल्कात लवकरच १ ते २ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसा विचार सुरू असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी पत्रकारांना सांगितले. लवकरच स्मार्ट सिटीच्या बैठकीत तसा निर्णय घेतला जाणार असल्याचेही सुतोवाचही त्यांनी केले.
शहरात सध्या ३२ हून अधिक मार्गावर स्मार्ट सिटी बस सुरू आहे. १०० पैकी ८८ बस रोज २३ हजार किलोमीटर धावतात. खुलताबाद, वाळूज, शेंद्रा एमआयडीसी हे मार्ग सर्वाधिक उत्पन्न देणारे आहेत. त्यामुळे या मार्गावर फेऱ्यादेखील जास्त ठेवण्यात आल्या आहेत. सध्या खर्च जास्त अन् उत्पन्न कमी अशी स्मार्ट सिटी बसची अवस्था आहे. प्रति किलोमीटर खर्च ६५ रुपये असून, त्या तुलनेत प्रति किलोमीटर अवघे ४० रुपये उत्पन्न मिळत असल्याचे स्मार्ट सिटी प्रशासनाचे म्हणणे आहे. इंधनाचे दर वाढतच असल्याने तिकीट शुल्कात वाढ गरजेची असल्याचे मत व्यक्त करत तसा प्रस्ताव सादर करण्याची तयारी स्मार्ट सिटी प्रशासनाने केली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये तिकीट दर वाढविण्यात आले होते.