वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यापुरते ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर भाजपमध्ये परतले. सिल्लोडच्या या महत्त्वाच्या राजकीय घटनेनंतर आता वैजापूरमध्ये राजकीय चर्चेने जोर पकडला आहे. दिनेश परदेशी हेही भाजपात परततील, अशी चर्चा सुरू झाली आहे. परदेशी यांनी या चर्चेला थेट खोटे ठरवले नसले तरी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैजापूरचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील नेते राजू शिंदे आणि सिल्लोडमधील पदाधिकारी सुरेश बनकर यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. मात्र तिघांचाही पराभव झाला. परदेशी यांचा शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांनी ४१ हजार ६५८ मतांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वी सुरेश बनकर हे स्वगृही दाखल झाले. त्यानंतर राजू शिंदे आणि दिनेश परदेशी यांची चर्चा सुरू झाली आहे. याला कारण छत्रपती संभाजीनगरची महापालिका आणि वैजापूरची नगरपालिका निवडणूक आहे.
या दोन्ही निवडणुकांत मोठ्या यशासाठी भाजपला या दोन्ही नेत्यांचा उपयोग होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर शहरात राजू शिंदे तर वैजापूर शहरात दिनेश परदेशी यांची ताकद आहे. त्यांना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. राजू शिंदे यांना भाजपमधीलच एका गटाचा विरोध असला तरी परदेशी यांच्याबाबतीत कुणाचा विरोध समोर येण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांच्या पत्नीही नगराध्यक्ष राहिल्या आहेत. नगर परिषदेवर परदेशी यांची पकड आहे. दरम्यान, याबाबत पत्रकारांशी बोलताना परदेशी म्हणाले, की लोकांत चर्चा सुरू असली तरी मी अजून निर्णय घेतलेला नाही. पदाधिकाऱ्यांसोबत बोलून निर्णय घेणार आहे.