छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दगडाने ठेचून सुरक्षारक्षक भाऊसाहेब नामदेव पडूळकर (वय ६०, रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) यांच्या खुनाचा उलगडा अवघ्या २४ तासांत वाळूज पोलिसांनी केला आहे. नागराज उर्फ नाग्या माधव गुंडीले (वय २७, रा. पंढरपूर, वाळूज एमआयडीसी) याला अटक केली आहे.
नगररोडवरील बजाज कंपनीसमोरील बाबा ट्रक बॉडी रिपेअरींग वर्क्स गॅरेजवर पडूळकर कामाला होते. गॅरेजमालक अशोक दाभाडे सोमवारी (८ जुलै) सकाळी नऊला गॅरेजवर आले असता, त्यांना लगतच्या बंद शेडसमोरील जागेत पडूळकर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले होते. नाग्या मित्रांसोबत गॅरेजसमोर आला होता. पडूळकर यांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले. त्यामुळे नाग्याला राग आला. यावरून दोघांत वाद होऊन नाग्याने पडूळकर यांचे डोके दोन वेळा भिंतीवर आदळले. त्यानंतर नाग्याने बाजूला असलेला दगड उचलून पडूळकर यांच्या डोक्यात घातला. यात पडूळकर यांचा जागीच मृत्यू झाला.
मूळचे जालना जिल्ह्यातील काजळा येथील भाऊसाहेब पडूळकर अनेक वर्षांपासून कुटुंबासह वाळूजला राहत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जनाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना मुलगा आकाश, सोनूबाई, मोनूबाई या दोन विवाहित मुली आहेत. ते ८ महिन्यांपासून गॅरेजवर सुरक्षारक्षक होते. रविवारी सायंकाळी सहाला जेवणाचा डबा घेऊन ते नाइट शिफ्टला आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह दिसला होता.