छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्न समारंभात विनापरवाना बॅण्ड वाजवाल तर पोलीस तुमचा बॅण्ड वाजविण्याची शक्यता आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चिकलठाणा रोडवरील दौलत लॉनसमोर बेंजो बॅण्ड वाजविणाऱ्याविरुद्ध सोमवारी (१७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करून त्याचे वाहन ताब्यात घेतले. सत्यवान बाबुराव पगारे (वय ३, संजयनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
पोलीस अंमलदार विजय उत्तमराव तेलुरे (वय ४९) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, पोलीस अंमलदार पोळ, गवळी यांच्यासह गस्तीवर असताना सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास चिकलठाणा रोडवरील दौलत लॉनसमोर वाहनावर(क्र. एमएच २० एटी ५४३४) बेंजो बॅण्ड वाजवत असल्याचे व वाहनांवर शार्पी लाईट व फोकस चालू असल्याचे दिसले. वाद्य वाजविणाऱ्यास पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे परवानाच नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.