छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील झेंडा चौकात म.न.पा. लिहिलेल्या सुसाट ट्रकने उडवले. यात वृद्ध गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यांच्यावर शहरातील ओरियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रविवारी (१६ फेब्रुवारी) या प्रकरणात वृद्धाच्या जावयाच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाजीराव यादवराव गाजरे (वय ४८, रा. सावता माळीनगर, सावता मंगल कार्यालयाजवळ, चिकलठाणा) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी ११ ला त्यांचे सासरे सांडू नामदेव करवंदे (वय ७५) हे सावतामाळीनगर चिकलठाणा येथील घरातून दाढी करण्यासाठी झेंडा चौक, जालना रोडवरील एका दुकानात आले. दुपारी साडेबाराला दाढी करून परत घराकडे जाण्यासाठी जालना रोड पायी ओलांडत असताना मुकुंदवाडीकडून ट्रक जोरात येत असल्याचे दिसल्याने ते दुभाजकाजवळ थांबले. मुकुंदवाडीकडून येणाऱ्याने ट्रकने (MH 20 CT 5485) त्यांना जोरात धडक दिली.
यात गंभीर होऊन करवंदे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अपघाताची माहिती कळताच बाजीराव गाजरे आणि, ओळखीचे मदन काळे, मुलगा सागर गाजरे यांनी त्यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिथून त्यांना ओरियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानपुरा येथे दाखल केले. करवंदे हे बेशुध्दावस्थेत असून, त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. त्यांना धडक देणाऱ्या ट्रकवर म.न.पा. असे लिहिलेले होते. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. जावई बाजीराव गाजरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.