छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावयाची आहे. लोकांना परवडणारी घरे देण्याचे कार्य सुलभ व्हावे यासाठी हे प्रशिक्षण असून त्याचा लाभ घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज, १७ फेब्रुवारीला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे विभागस्तरीय- शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणात विभागातील ५ महानगरपालिका व ७५ नगरपालिकांचे मुख्याधिकारी, अभियंते, आवास योजनेशी संबंधित तांत्रिक सल्लागार आदी सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे सल्लागार सारिम खान आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना पहिल्या टप्प्यात ज्या अडचणी आल्या त्यावर उपाययोजना शोधाव्या यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. तांत्रिक आणि प्रत्यक्ष अडचणींचे निराकरण होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन घ्यावे. गोरगरिबांना स्वतःचे घर देण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशिल, गतिमान पद्धतीने काम करावे, असे ते म्हणाले. प्रशिक्षणात योजनेचा आढावा, प्रगती, निधी वितरण, अखर्चित निधी, जिओ टॅगिंग याबाबत रवींद्र खेतले, प्रधानमंत्रीआवास योजनेची ध्येय-उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत मुकुल बापट, प्रधानमंत्री आवास योजनेचे युनिफाईड पोर्टल, ऑनलाईन अर्ज भरणे याबाबत सारिम खान हे मार्गदर्शन करणार आहेत.