बाबरा/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ५०० वर्षांचा इतिहास असलेल्या बाबरा (ता. फुलंब्री) येथील श्री बालाजी संस्थान मंदिराजवळ भक्तनिवासाच्या खोदकामादरम्यान रविवारी (१६ फेब्रुवारी) ५ किलो ६०० ग्रॅम चांदी मिळून आल्याने खळबळ उडाली. संस्थानने तातडीने तहसीलदार आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर बांधकाम थांबवून ही चांदी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

बाबरा येथील श्री बालाजी तीर्थक्षेत्राचा लौकीक आहे. श्री तिरुपती बालाजी श्रीमंत व देऊळगाव राजाचा बालाजी राजा व बाबरा येथील बालाजींना खजिनदार ही उपाधी पुरातन काळापासून आहे. बाबरा येथील श्री तिरुपती बालाजी संस्थानला भक्त निवासासाठी जागेची कमतरता भासत होती. निखील बाळूशेठ महाले यांचे आजोबा व आजी बाबऱ्याचे आहेत. त्यांची इच्छा होती की बालाजी मंदिराला लागूनच असलेली जागा मंदिर संस्थानला दान द्यावी. रविवारी सर्व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेची मोजणी करून कै. बाबुशेठ रामचंद्र महाले (सोनार) यांची जागा १२४.७ चौरस मीटर (१३००.३७ स्क्वेअर फूट) जागेतील निम्मी जागा ही कै. रमेश बाबुशेठ महाले व कै. बाळासाहेब बाबुशेठ महाले यांच्या स्मरणार्थ श्री तिरुपती बालाजी संस्थान मंदिर ट्रस्टला दान करण्यात आली. ट्रस्टकडून याबद्दल निखिल बाळासाहेब महाले (सोनार) यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी रामचंद्र जाधव, शिवा पाटील, सुधाकर महाले यांच्यासह बाबरा येथील मंदिराचे ट्रस्टी कचरु मैंद, प्रदिप खंडेलवाल, चंद्रभान पवार, संजय चव्हाण व गावकरी मंडळी उपस्थित होते. या दानपत्र कार्यक्रमानंतर लगेचच भक्तनिवासासाठी खोदकाम करण्यास सुरुवात झाली. तीन-चार फूट खोदकामानंतर गुप्तधन मिळून आले. चांदीचे दागदागिने मिळून आले. त्यानंतर ट्रस्टकडून लगेचच वडोद बाजार पोलीस ठाणे, फुलंब्री तहसीलदार कृष्णा कांगुळे व पुरातत्व विभागाला कळविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

रात्री उशीरापर्यंत सर्व अहवाल तयार करून मोजमाप करून पोलीस बंदोबस्तात दागिने सुरक्षित ठेवण्यात आले. आज, १७ फेब्रुवारीला मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, गावकरी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व चांदीच्या वस्तूंची शहनिशा बाबरा येथील हरिओम ज्येलर्सचे शिवनारायण सोनवणे यांनी केली. त्यावरून ती पूर्वीची शुद्ध चांदी असल्याचे दिसून आले. सर्व एक एक नग मोजून पंचनामा करण्यात आला. आज पुन्हा एकदा वजन करण्यात आले असता ५ किलो ६०० ग्रॅम भरले आहे. सर्वांच्या उपस्थितीत सील बंद करून ते तहसीदारांच्या सुपूर्द करण्यात आले. बांधकामासाठी हे दागिने मिळावेत, अशी विनंती ट्रस्टने केली असता सरकारी प्रक्रिया करून पाठपुरावा करावा लागेल, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
