छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरफोड्या, चोऱ्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांच्या मुसक्या जवाहरनगर पोलिसांनी दर्गा चौकात रविवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी आवळल्या. पोलिसांना पाहून दोघेही पळाले, पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि लॉकअपमध्ये डांबले. सिकंदर खान ऊर्फ भाई नजीर खान (वय ४५, रा. शहानूरवाडी, उस्मानपुरा), शोएब खान ऊर्फ गुड्डू असिफ खान (वय २९, रा. शिवशंकर कॉलनी) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
मोबाइल चोरला अन् पकडले गेले…
रविवारी (१६ फेब्रुवारी) शंकर नामदेव दाभाडे (वय ४८, रा. चिकलठाणा परिसर) हे डी-मार्टजवळील शहानूरवाडी आठवडे बाजारातून भाजीपाला घेत होते. चोरट्याने त्यांच्या वरच्या खिशातून विवो कंपनीचा १३ हजार रुपयांचा मोबाइल चोरला. दाभाडे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या आदेशावरून विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, श्रीकांत काळे, मोफतलाल राठोड यांनी गस्तीदरम्यान चोरट्याचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून चोरटा दर्गा चौकात असल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी तत्काळ तिथे धाव घेतली. पोलिसांना पाहून चोरटे पळून जाऊ लागले.
सिनेस्टाइल पाठलाग, थोड्याच अंतरावर पकडले…
पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत दोघांनाही पकडले. त्यांनी मोबाइल चोरल्याची कबुली दिली. सिकंदर खानविरुद्ध यापूर्वी मोबाइल चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शोएब खानविरुद्ध कलम ३०७ नुसार गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार श्री. देगलूर, विशेष पथकाचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, श्रीकांत काळे, मोफतलाल राठोड यांनी ही कारवाई केली.