गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे मामा-मामीने आपल्या १५ वर्षीय भाचीचे लग्न २३ वर्षीय तरुणासोबत लावून दिले. लग्नाचे वय नसतानाही केलेला हा उपद्व्याप केवळ मामा-मामीच नव्हे तर भटजी, मंडपी आणि लग्नाला हजर असलेल्या १५० वऱ्हाडींच्याही अंगलट आला आहे. गंगापूर पोलिसांनी या सर्वांविरुद्ध रविवारी (१६ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामपंचायत अधिकारी राहुल समाधान चराटे (वय ५०, रा. शिक्षक कॉलनी गंगापूर) यांनी चाइल्ड हेल्पलाईनच्या जयश्री घावटे-ठुबे, उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, पूजा दहातोंडे, गट विकास अधिकारी सुहास वाकचौरे यांच्या आदेशावरून गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत नवरा मुलगा सनी निवृत्ती भालेकर, त्याचे आई-वडील मंगल निवृत्ती भालेकर व निवृत्ती सुभाष भालेकर (तिघे रा. बालानगर ता. पैठण), लग्न लावणारे भटजी प्रमोद कुलकर्णी, मंडप लावणारे प्रमोद मोहिते, स्वयंपाकी, मुलीचे मामा, मामी (सर्व रा. भेंडाळा) आणि लग्नाला उपस्थित दीडशे वऱ्हाडी यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे.

नक्की काय घडले?
गुरुवारी (१३ नोव्हेंबर २०२४ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास भेंडाळा (ता. गंगापूर) येथील माधुरी (नाव बदलले आहे, वय १५ वर्षे ११ महिने, रा. माळीवाडा ता. छत्रपती संभाजीनगर ह. मु. बालानगर ता. पैठण) हिचा बालविवाह सनी निवृत्ती भालेकर (वय २३, रा. बालानगर ता. पैठण) याच्यासोबत मुलीच्या मामाच्या घरासमोर लावण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिचे लग्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलगी सासरी गेल्यानंतर पहिल्या रात्रीच पतीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अल्पवयीन मुलीला सहन न झाल्यामुळे ती चक्कर येऊन पडली. मात्र, नातेवाइकांनी हळदीच्या अंगाची नवरी असल्यामुळे कोणीतरी भानामती केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार बीड जिल्ह्यात मढी येथील एका मांत्रिकाकडे अल्पवयीन मुलीवर दीड ते दोन महिने उपचार करण्यात आले. त्याचदरम्यान महिला सुरक्षा संघटनेच्या जयश्री घावटे-ठुबे यांनी चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क करीत घटनेची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी लग्न लावलेल्या मुलीचा शोध सुरू केला. बालानगर येथे १६ फेब्रुवारी रोजी मुलगी आल्याची माहिती समजताच एमआयडीसी पैठण पोलिसांच्या मदतीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, सुप्रिया इंगळे, दीपक बजारे, आम्रपाली बोर्डे, यशवंत इंगोले, राहुल चराटे यांच्या पथकाने छापा मारून मुलीचा ताबा घेतला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे आवाहन…
अनाथ मुलगी असेल, एक पालक सांभाळण्यास सक्षम नसतील तर महिला व बालविकास विभागाच्या बालगृहात बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार प्रवेश करून बालिकेचे बालपण जपण्याचे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी केले आहे. सध्या बालिकेला महिला व बाल विकास विभागाच्या बालगृहात बाल कल्याण समिती अध्यक्ष आशा शेरखाने यांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आले आहे. बालिकेची सुरक्षित सुटका करण्यात पथकातील कायदा व परिवीक्षा अधिकारी जिल्हा बाल संरक्षण सुप्रिया मधुकर इंगळे, बाल संरक्षण अधिकारी दीपक बाजारे, प्रभारी प्रकल्प समन्वयक आम्रपाली बोर्डे, सुपरवायझर यशवंत इंगोले यांनी मोलाची कामगिरी बजावली. जिल्ह्यामध्ये कुठेही बालविवाह होत असेल तर चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या नंबरवर कॉल करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.