पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : एसटी महामंडळाची बस आपलीच जहॉगिरी असल्याच्या अविर्भावात काही वाहक वावरत असतात. याचाच प्रत्यय पाचोडमध्ये आला. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार देणाऱ्या महिला वाहकाला प्रवाशाने जाब विचारला असता महिला वाहकाने वाद घालून प्रवाशाच्या कानशिलात वाजवली… त्यामुळे प्रवाशाच्या संतापाचा कडेलोट झाला आणि महिला वाहकासोबत त्याची हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (९ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास पाचोड येथील बसस्थानकात घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अशा कटू घटना टाळण्यासाठी चालक-वाहकांना सभ्य वर्तनाच्या सूचना कराव्यात आणि प्रवाशांच्या सेवेसाठी आपण असल्याची जाणीव करून द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वतःची आधी चूक असूनही महिला वाहकाने पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रवाशाविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
सविता आदिनाथ तोंडे (वय ३४) असे महिला वाहकाचे नाव असून, मारहाण केल्याचा आरोप लावलेल्या प्रवाशाचे नाव अजय जगन्नाथ डुकळे (रा. पाचोड) असे आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आंबाजोगाई ते छत्रपती संभाजीनगर बस (क्र. एमएच २० बीएल २८०४) मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निघाली होती. ही बस सकाळी सव्वा नऊला पाचोड येथील बसस्थानकात आली. तिथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाल्यानंतर आडूळला जाण्यासाठी अमोल डुकळे, विद्यार्थी व अन्य काही प्रवासी बसू लागले. विद्यार्थी बसमध्ये बसत असल्याचे पाहून महिला वाहकाने त्यांना कुठे उतरणार अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांनी आडूळचे नाव सांगताच महिला वाहकाने त्यांना बस तिथे थांबणार नाही, उतरा, असे सांगितले. त्यावर अमोल डुकळे याने बसला प्रत्येक थांबा आहे, मग थांबणार का नाही, अशी विचारणा केली.
त्यावर महिला वाहकाने आडूळला बस थांबणार नाही, आधी उतर, अशी अरेरावी केली. त्यावर डुकळे याने मोबाइल काढून महिला वाहकाच्या अरेरावीचा व्हिडीओ करायला सुरुवात केली. त्यावर महिला वाहकाने माझा व्हिडीओ काय काढतो, असे म्हणत डुकळे याच्या कानशिलात लगावली. एवढ्या सर्व प्रवाशांसमोर महिला वाहकाने थेट कानशिलात मारल्याने डुकळे याचाही संताप अनावर झाला. महिला वाहक आणि डुकळेमध्ये बसमध्येच जोरदार हाणामारी सुरू झाली. दोघांना इतर प्रवाशांनी शांत करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर एसटी बस सरळ पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली. तिथे सविता तोंडे या महिला वाहकाच्या तक्रारीवरून प्रवासी अमोल जगन्नाथ ढुकळे याच्याविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एसटी बसेस थांबत नाहीत…
पाचोड बसस्थानक महत्त्वाचे असून, येथून दररोजतीनशे ते साडेतीनशेच्या जवळपास एसटी बसेस ये-जा करीत असतात. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस गावाचे थांबे घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. आडूळला थांबा असूनही एसटी बसेस बायपासने निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. ज्या बसमध्ये महिला वाहक होती, ती लांब पल्ल्याची नव्हती. तरीही आडूळचा थांबा घेणार नसल्याचे सांगत प्रवाशांना उतरून जायला त्या सांगत होत्या, हे विशेष. एसटी महामंडळाच्या धोरणालाच हरताळ फासण्याचे काम महिला वाहकाने केल्याच्या प्रतिक्रिया पाचोडमध्ये उमटल्या. त्यामुळेच ही कटू घडल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.