खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) एका गायीच्या पोटातून २५ किलो प्लास्टिक काढून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे प्राण वाचवले. गायींना आहारात खनिज मिश्रण, प्रथिनांची कमतरता झाल्यास जनावरे उघड्यावरील प्लास्टिक व इतर वस्तू खातात. यामुळे अशा गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. पशुपालकांनी जनावरांना रोज क्षारमिश्रण किंवा मिनरल मिक्सर त्यांच्या आहारातून द्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप मोराळे यांनी केले आहे.
पशुपालक शब्बीर शहा (रा. गल्लेबोरगाव) यांची गाय महिनाभरापासून आजारी होती. रक्त तपासणी तसेच धातूशोधक यंत्राने तपासणी करून पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप मोराळे यांनी तिच्या पोटात प्लास्टिक व काही तार, खिळे असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी गायीवर रुमिनोटॉमी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून चक्क २५ किलो प्लास्टिक बाहेर काढले. यामुळे गायीचे प्राण वाचले आहेत. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. मोराळे यांना डॉ. दोडके व खासगी पशुवैद्यक तुषार काळे, करण चव्हाण यांनी सहकार्य केले.