वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात जाताना पाय घसरून कालव्यात पडल्याने प्रवीण संजय वैद्य (वय २२, रा. सवंदगाव, ता. वैजापूर) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव शिवारात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊला घडली.
प्रवीणने शेतात कांदा पिकाची लागवड केली असून, पिकाला पाणी भरण्यासाठी तो शेतात जात होता. नांदूर मधमेश्वर कालव्यात तो पाय घसरून पडला. मदतीला कुणीच न आल्याने बुडाला. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. कालव्यात त्याचा मृतदेह दिसून आला. त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली आहे. प्रवीणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.