कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी चापानेर (ता. कन्नड) येथील झेंड्याच्या कठड्याला धडकून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अशोक रामहरी खेडकर (वय ३४, रा. आंबा, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो औराळ्याहून कन्नडकडे जात होता.
चापानेर येथे रोडच्या मधोमध झेंड्याचा कठडा आहे. त्याला धडकल्यानंतर अशोकला गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब धनुरे अधिक तपास करत आहेत. चापानेर येथील या चौकात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.