छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराचा ‘बिस्मिल्ला’ करून ‘काँग्रेस’चे कल्याण केल्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील उफाळून आलेले राजकीय वैरत्व आता वेगळ्याच वळणावर आले आहे. दोघांचे पक्ष महायुतीत एकत्र आहेत, मात्र दोघेही एकमेकांना पाण्यात पाहण्याची संधी सोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपचाच पदाधिकारी ठाकरे गटात नेऊन उमेदवारी मिळवून देत पराभवाचा वचपा दानवे यांनी काढला. त्यानंतर आता सुरेश बनकर यांना पुन्हा भाजपातही घेतले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा सत्तारांवर टीकेची तोफ डागली. सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचा पुनरूच्चार करत दानवे यांनी सत्तारांचे मंत्रीपद भानगडीमुळेच गेल्याचा दावा केला.
काय म्हणाले रावसाहेब दानवे…
जालन्यात पत्रकारांशी बोलताना भाजप नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले, की चौकाच्या नावावरूनच सिल्लोड गावाची रचना कळते. तिथे सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा पंडित नेहरू यांच्या नावाचा चौक कुठेच दिसणार नाही. खायचे इथले आणि गायचे दुसरीकडे, असा सर्व प्रकार आहे. तिथे पाकिस्तान सारखीपरिस्थिती निर्माण झाली आहे. महापुरुषांच्या पुतळ्याच्या नावाखाली सरकारची जमीन हडप करण्याचा अब्दुल सत्तार यांचा डाव आहे. याला उच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे. सिल्लोडमधील जिल्हा परिषद शाळेची अशीच मोठी जागा या आधी पालिकेत घेतली होती. नंतर ती शाळा जमीनदोस्त करण्यात आली. आता तिथे शॉपिंग सेंटर बांधून पैसे घेतील. सत्तारांचे मंत्रीपद हे त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या भानगडींमुळे गेले. यासंबंधी आपल्याकडे अनेक गोष्टींची माहिती आहे. मात्र, ही सर्व माहिती खासगीत सांगतो, असे शरसंधान दानवे यांनी साधले आहे.
मंत्रीपदी डावलले…
अब्दुल सत्तार यांना या सरकारमध्ये मंत्रीपद दिलेले नाही. त्यांच्या मंत्रिपदाला भाजपचा ठाम विरोध होता. शिंदे गटाच्या कोट्यातून संजय शिरसाट यांना मंत्रीपद देण्यात आले. त्यांना पालकमंत्रीही करण्यात आले. विशेष म्हणजे, मंत्री होताच संजय शिरसाट यांनी सत्तारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या निमित्ताने अब्दुल सत्तारांनी छत्रपती संभाजीनगरात मोठे शक्तीप्रदर्शनही केले होते.