छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ३ मधील हॉटेल मानसीमध्ये २० वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीला नेऊन ४१ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. त्यानंतर स्पा सेंटर सुरू करून देतो, तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करवला. नंतर मात्र लग्नाला नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संतोष देवराव गादे (४१, रा. टाकळी, ता. नेवासा, जि. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीच्या तक्रारीनुसार, तिच्या लैंगिक शोषणाचा प्रकार ९ सप्टेंबर २०२३ ते ८ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे. पीडित तरुणी नागपूरची असून, सध्या बीड बायपास भागात राहते. ती जुलै २०२३ मध्ये कामाच्या शोधात छत्रपती संभाजीनगरात आली.
सेवनहिल उड्डाणपूल परिसरातील सनशाईन स्पा सेंटरमध्ये तिला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम लागले. तिथे संतोष गादे थेरपीसाठी यायचा. तरुणी त्याला सेवा द्यायची. यातून दोघांत ओळख झाली. ओळखीतून त्याने तिच्याशी जवळीक साधत तिला वेगळे स्पा सेंटर सुरू करून देण्याचे आमिष दाखविले. ९ सप्टेंबर २०२३ रोजी तिला मानसी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
बजरंग चौकात सुरू केले स्पा सेंटर…
संतोषने तिला बजरंग चौकात ऑरगा स्पा सेंटर चालविण्यासाठी दिले. त्यासाठी तिच्यासोबत करारनामा केला. याकाळात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार तो करत राहिला. तिने शारीरिक संबंधास नकार देऊ नये म्हणून तो लग्नाचे आमिष दाखवत होता. यातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे तिने संतोषकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र तो टाळाटाळ करू लागला.
तरुणीने त्याला मी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावर संतापलेल्या संतोषने दारू पिऊन तिला शिवीगाळ व जबर मारहाण केली. २० जून २०२४ रोजी आदित्य हॉस्पिटलमध्ये तिला नेऊन गर्भपात करवला. या सर्व प्रकारानंतर तरुणीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. तिने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून संतोषविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर करत आहेत.