वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय विवाहित युवतीने शिऊर पोलीस ठाण्यात धावून एका माथेफिरूविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याने तिचा डीपी लावून फेक खाते उघडले आणि डीपी हटवायचा असेल तर १ हजार रुपये लागतील, असे धमकावले. तेवढ्यावरच न थांबता त्याने दोघांतील संभाषणाचे कथित स्क्रिनशॉटही व्हायरल केले. शिऊर पोलिसांन गुन्हा दाखल करून त्या माथेफिरूचा शोध सुरू केला आहे.
युवतीने तक्रारीत म्हटले आहे, की पती आणि मुलाबाळांसह राहते. तिचे पती शेती करतात. ७ फेब्रुवारीला दुपारी चारला ती घरी असताना मोबाइलवर तिचे इन्स्टग्राम खाते बघत होती. तिला एका इन्स्टाग्राम खात्यावरून हाय असा मेसेज आला. त्या अनोळखी इन्स्टाग्राम वापरकर्त्याने चक्क तिच्याच फोटोचा डीपी लावला होता. युवतीने त्याला रिप्लाय केला असता त्याने मेसेज केला, की तू मला १ हजार रुपये पाठव तरच मी तुझा डीपी बंद करतो. त्यावर युवतीने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगत कॅश देते, असे सांगितले.
मात्र त्याने स्कॅनर पाठवले. मात्र युवतीने त्याला कॅश देते, असे सांगितल्याने समोरच्या व्यक्तीने चक्क तुला हे महागात पडेल, असे म्हणून धमकावले. तिने ही गोष्ट पतीला सांगितली. तिच्या पतीनेही त्याला जाब विचारला. त्यानंतर समोरील व्यक्तीने चक्क युवतीने त्याच्यासोबत चॅटिंग केली, असे स्क्रिनशॉट मोबाइलवर टाकून गावात तिची बदनामी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक वैभव रणखांब करत आहेत.