छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एका चोराने घरात घुसून मोबाइल, पाकीट चोरले. ही बाब लक्षात येताच मोबाइलच्या लोकेशनवरून चोराचे घर शोधून काढत त्याला घरातून ताब्यात घेत नागरिकाने पोलिसांच्या स्वाधीन केले. ही खळबळजनक घटना सिडकोतील सुदर्शननगरमध्ये सोमवारी (८ जुलै) सकाळी घडली.
नक्की काय घडले?
सोमवारी सकाळी साडेसातला सुदर्शननगर येथील रमेश कौतिकराव विधाटे (वय ४५) यांची पत्नी अंगण झाडण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यांची नजर चुकवून चोरटा घरात शिरला. घरातील पाकीट आणि दीड लाखाचा मोबाइल चोरून तो पसार झाला. रमेश विधाटे उठल्यावर त्यांना पाकीट आणि मोबाइल जागेवर दिसले नाही. त्यांनी शोधाशोध घेऊनही दिसत नव्हते.
त्यांनी मोबाइलचे लोकेशन शोधले असता ते किराडपुऱ्याचे निघाले. त्यांनी तातडीने घराचे सीसीटीव्ही फुजेट तपासले. मोबाइलवरील लोकेशननुसार रमेश थेट चोराच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांनी तेथून सिडको पोलिसांना संपर्क करून त्यांना बोलावून घेतले. पोलिसांनी सय्यद हनिफ सय्यद शहा उर्फ बुवा (रा. किराडपुरा) या चोरट्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅटर्न लॉकमुळे अडकला…
चोरट्याला पॅटर्न लॉकमुळे मोबाइल बंद करता आला नाही. तोपर्यंत इधाटे यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये फाइंड माय डिव्हाईस हे ॲप्लिकेशन सुरू केले होते. या ॲपवरून त्यांनी मोबाइल ट्रॅक केला. हा मोबाइल किराडपुरा भागात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मित्राला सोबत घेत थेट चोराचे घरच गाठले. हनीफ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विधाटे यांच्या हुशारीमुळे या चोराने चांगलाच धडा शिकला आहे.