पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : घरगुती वादातून लोखंडी रॉड डोक्यात घालून दारूड्या पतीने पत्नीचा खून केला. ही खळबळजनक घटना घटना आपेगाव (ता. पैठण) रविवारी (७ जुलै) मध्यरात्री घडली. या प्रकरणी पैठण पोलिसांनी सोमवारी (८ जुलै) दुपारी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मनिषा ज्ञानेश्वर प्रव्हाणे (वय ३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
ज्ञानेश्वर भगवानराव प्रव्हाणे (वय ३५) हा पत्नी मनिषा, एक मुलगी (वय ८) व दोन मुलांसह (वय १२ व १० वर्षे) आपेगाव येथे राहत होता. तो दारू पिऊन मनिषाला सतत मारहाण करायचा. रविवारी रात्रीही दारू पिऊन घरी आला. त्याचा पत्नीसोबत वाद झाला. बाजूला राहणारे त्याचे आई-वडील आले. त्यांनी ज्ञानेश्वरला समजावून सांगितले. मात्र त्याने त्यांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे ते तिन्ही मुलांना घेऊन घरी गेले. त्यानंतर ज्ञानेश्वरने पत्नी मनिषाच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले. यात मनिषाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर पळून गेला. मनिषाचे वडील कैलास नवगिरे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वरविरुद्ध नवीन कायद्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.