छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वय ३४ झाले तरी लग्न होत नसल्याने नैराश्य आलेल्या सतीश गंगाधर बरगे या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (८ जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास वाळूजच्या लायनगरात घडली.
सतीश हा आई अंतिकाबाई बरगे यांच्यासोबत राहत होता. त्याचा लहान भाऊ सुरेश हा पत्नीसह अन्यत्र राहतो. घटनेवेळी सतीशची आई अंतिकाबाई नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. घरी एकटाच असल्याची संधी साधून सतीशने गळफास घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरेशचा बकवालनगरात राहणारा भाचा घरी आला असता त्याला घराचा दरवाजा लोटलेला दिसला. तो घरात आला असता सतीश पंख्याच्या हुकला दोरीने लटकलेला दिसला.
भाच्याने आरडाओरडा केल्याने शेजारील लोक धावून आले. त्यानंतर या घटनेची महिती आई व नातेवाइकांना देण्यात आली. नातेवाइकांनी पोलिसांच्या मदतीने सतीशला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दुपारी एकच्या सुमारास त्याला मृत घोषित केले. लग्न जुळत नसल्याने सतीश चिंतित होता. लहान भावाचे लग्न झाले होते, पण त्याचे कुठेच जुळत नव्हते. त्यामुळे तो मद्याच्या आहारी गेला होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. वाळूज पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार के. डी. जाधव करत आहेत.
शिऊरमध्ये युवकाची आत्महत्या
वैजापूर : तालुक्यातील खरज येथे विष पिऊन गणेश कचरू शिंदे (वय ३७) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (८ जुलै) सकाळी समोर आली. गणेशने सकाळी आठला विष घेतले. ही बाब लक्षात येताच शेजारील शेतकऱ्यांनी त्याला शिऊर येथील आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून गणेशला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आले नाही. शिऊर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.