सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात गेलेले सुरेश बनकर लवकरच पुन्हा भाजपात दाखल होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपने दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर लागले आहे.
महायुतीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ शिंदे गटाला गेला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना टक्कर देण्यासाठी बनकर यांनी भाजपमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची साथही लाभली. मात्र त्यांचा अवघ्या २८४० मतांनी पराभव झाला. बनकर हे भाजपचे अनेक वर्षांपासून पदाधिकारी राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी केलेल्या तडजोडीनंतर ते पुन्हा भाजपात दाखल होतील, अशी चर्चा होतीच. आता त्या चर्चेला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. सध्या मनाने भाजपमध्ये, शरीराने ठाकरे गटात अशी अवस्था बनकर यांची झाली आहे. एकीकडे ते ठाकरे गटात असले तरी, त्यांच्या संपर्क कार्यालयात मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत.
महापुरुषांची जयंती साजरी करतानाही भाजप पदाधिकारी उपस्थित असतात. आता दिल्ली निवडणुकीतील यशाचे भाजपचे बॅनरही त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर लागले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे फोटो व कमळ निशाणी आहे. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीविरोधात विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना पक्षप्रवेश देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बनकर यांचा प्रवेश लांबला असला तरी, लवकरच रावसाहेब दानवे हे त्यांचा प्रवेश पुन्हा भाजपात घडवून मोठी जबाबदारी देतील, अशी शक्यता आहे.