कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या गावागावात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे. उपळा (ता. कन्नड) येथेही महापुरुषांचा पुतळा उभारण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आणि त्यासाठी धाकपटशा करून वर्गणीची वसुली सुरू केली. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ५ हजार रुपये देण्याची सक्ती केल्यानंतरही पुतळा उभारला जाणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मोठ्या नेत्यांना टार्गेट केले. ३ नेत्यांकडून वसुली केल्यावर आमदार उदयसिंह राजपूत यांचा नंबर आला. ते गावात येणार असल्याचे कळताच गावात येण्याआधीच त्यांना अडवले. वर्गणीची सक्तीने मागणी केली. त्यावर आ. राजपूत यांनी तुम्ही आधी सांगायला हवे होते. माझी २१ हजार रुपये देण्याची इच्छा आहे. अशी बळजबरी काही कामाची नाही, असे तरुणांना सांगितले. त्यावर या तरुणांनी तुम्ही आता ५० लाख दिले तरी नको, असे म्हणत त्यांना गावात येण्यास मज्जाव केला. अखेर तिथून आ. राजपूत माघारी फिरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सध्या गावागावात जातीय तणाव वाढत चालला आहे. यातून वर्चस्ववादाची स्पर्धाही रंगली असून याचे चटके मात्र सामान्यांना सोसावे लागत आहे. अशातच उपळा गावातही महापुरुषांचा पुतळा उभारण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ५ हजार रुपये वसुली सुरू केली. गरीबांना महिन्यासाठी ३-४ हजार रुपयेही उत्पन्न नसते, त्यांनाही ५ हजार द्यावेच लागतील असे फर्मान सोडण्यात आले. मात्र एवढे करूनही आपल्याला हवा तसा पुतळा उभारला जाणार नाही हे लक्षात आल्यावर तरुणांनी नेत्यांकडे लक्ष वळवले. ३ नेत्यांकडून हवी तशी वर्गणी पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांचा मोर्चा तालुक्याचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्याकडे वळला. त्यात आ. राजपूत ते उपळा येथे येणार असल्याचे त्यांना कळले.
त्यांनी कालीमठ येथेच आ. राजपूत यांची गाडी अडवली. आम्ही लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा गावात बसवत आहोत. याकरीता तुम्ही वर्गणी द्या, अशी मागणी केली व हट्टाने पेटून उठले. यावर आ. राजपूत यांनी याविषयी मला तुम्ही आधी सांगायला हवे होते. अशी बळजबरी कामाची नाही. पुतळ्यासाठी २१ हजार रुपये देण्याची माझी इच्छा आहे…, असे सांगितले. मात्र ठराविक रकमेवर अडून बसलेल्या तरुणांनी, तुम्ही ५० लाख रुपये दिले तरी आता नको, असे म्हणत त्यांना गावात जाण्यास मज्जाव केला. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आ. राजपूत यांची गाडी कालिमठ येथूनच परतली. याविषयी आ. राजपूत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तरुणांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वर्गणी ही वसुली नव्हे, अशा प्रतिक्रिया उमटत असून, अशानेच चांगल्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.