छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर, विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हा टोला होता, की खरंच तसा काही विचार शिरसाट यांनी सुरू केलाय, याबद्दल चर्चाचर्वण घडत आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीने रविवारी (९ फेब्रुवारी) रात्री विजय चौकात पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. व्यासपीठावर माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, शिल्पाराणी वाडकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले, की नगरसेवक झालो, नंतर आमदार बनलो. दुसऱ्यांदा आमदार, तिसऱ्यांदा आमदार आणि आता चौथ्यांदा आमदार झालो. मंत्री आणि पालकमंत्रीही बनलो. इतक्यावेळा आमदार होणे सोपं नाही. माझी पहिल्या निवडणुकीतच दमछाक झाली होती. मात्र नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत माणसं जोडत गेलो. कुणाविषयीही द्वेषभाव ठेवला नाही. आता पाचव्यांदा, सहाव्यांदा निवडणूक जिंकणे अवघड नाही. कुठेतरी थांबले पाहिजे.

महाराजांप्रमाणेच भाषण देण्यात पटाईत झालो आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर कदाचित महाराज होईल. लोक पायाही पडतात, तोपर्यंत पाच वर्षे तेवढे राजकारणात राहू द्या. आतापर्यंतच्या आयुष्यात स्वाभिमानाने लढलो, यापुढेही स्वाभिमानाने जगेल, असे शिरसाट म्हणाले. लोक काम का करतात? चांगलं घर बांधता यावं, बायकोला दागिणे घेता यावेत, गाडी घेता यावी म्हणूनच ना? मीही माझ्या बायकोसाठी बंगला बांधला, काय गैर केले. काही जण म्हणतात हे बरोबर नाही. लोकांच्या डोळ्यात येते. पण मी म्हणतो आग लागू द्या त्यांच्या डोळ्यांना. अरे आयुष्यच किती आहे, एवढी काळजी कशाला करायची. सगळं करा, फक्त लोकांचे तळतळाट घेऊ नका, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. शिवसेना कॉलनीतील राजेंद्र जंजाळ यांच्या संपर्क कार्यालयाचे मंत्री अतुल सावे यांच्यासह उद्घाटनही मंत्री शिरसाट यांनी केले.
सत्तार यांनीही दिले होते निवृत्तीचे संकेत…
कुठे तरी थांबलं पाहिजे. आयुष्यात शांतताही महत्वाची असते. आता एवढे पाच वर्षे राजकारणात राहू द्या, असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले असले तरी, एकूण वय आणि सध्याचे राजकारण पाहता इतक्यात ते राजकारणातून निवृत्त होतील, अशी कोणतीही शक्यता नाही. मात्र अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय निवृत्तीच्या घोषणेची चर्चा यानिमित्ताने पुन्हा झाली. लोकांना विकास नकोय. फक्त जातीवाद हवा आहे. निवडणुकीत शेवटच्या चार दिवसांत वातावरण बदलून जाते. मी अठरा- अठरा तास काम करतो, तरीही लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. जर असेच असेल तर मलाही राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्यामुळेच मी ठरवलंय की पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, असा निर्णय सिल्लोडचे आमदार तथा माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी १३ जानेवारीला जाहीर केला होता. कदाचित पुढच्या निवडणुकीत सत्तार हे आपल्या पुत्राला उभे करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.