छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सर्व मराठा संघटनांनी एकत्र येऊन रणशिंग फुंकण्याचे ठरवले आहे. आरक्षणासह आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाशी संबंधित विविध मागण्यांकडे याद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. १२ हून अधिक संघटनांच्या वतीने २२ फेब्रुवारीपासून क्रांतीचौकात मराठा आरक्षण चिंतन आंदोलन केले जाणार असून, आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज, १० फेब्रुवारीला पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
रमेश केरे पाटील, राजेंद्र दाते पाटील आणि रवींद्र काळे पाटील म्हणाले, की आमच्यासह अनेक जण उपोषणाला बसतील. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. मराठा आरक्षण मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत. अद्याप मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना झाली नाही. या समितीचे अध्यक्ष कोण असेल, हेही स्पष्ट नाही. राज्य सरकारच्या हातात असूनही अनेक मागण्या अद्याप पूर्ण नाहीत. सरकारने दिलेले १० टक्के एसईबीसीचे आरक्षण आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाला घटनेत टिकणारे आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. हे आरक्षण कसे देणे शक्य आहे, याविषयीचे सादरीकरणही आंदोलनादरम्यान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास उपोषण करणार आहोत, असा इशारा यावेळी देण्यात आला.