छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला आता गौताळा अभयारण्याची दारे बंद झाली आहे. ती १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याने गौताळ्याच्या वर्षा पर्यटनाचे प्लॅनिंग बदलावे लागणार आहे. याची काही कारणे वनविभागाने दिली असली तरी यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
२०१४-१५ ते २०२४-२५ या दहा वर्षांसाठीच्या व्यवस्थापन आराखड्यानुसार गौताळा औट्रम अभयारण्यात तीन महिने प्रवेशास बंदी ठेवण्याची तरतूद आहे. नदी, नाले, दरी, मोठी झाडे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे मागील वर्षीपासून ही बंदी करण्यात येते.
ही दिली कारणे…
-पावसाळ्यात वन परिक्षेत्रात नवनवीन वृक्षांच्या बिया रुजण्याच्या अवस्थेत असतात. या कोवळ्या रोपांवर पर्यटकांची पावले पडल्यास ती रोपे नष्ट होतात.
-पावसाळ्याचे तीन महिने हे जवळपास सर्वच पशुपक्षी, कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. पर्यटकांच्या उपस्थिती आणि हस्तक्षेपामुळे त्यांच्या क्रियेत बाधा उत्पन्न होते.
-पर्यटक मंडळी वनक्षेत्रात मोठमोठ्याने आवाज करतात. यामुळेहे जीव घाबरतात. वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती वाढते.