छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार डिव्हायडर ओलांडून स्कूटीला धडकली. यात अॅड. सतीश शाहुजी मगरे (वय ३२) व त्यांची पत्नी तेजल मगरे (वय ३०, मूळचे रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंबेवाडी फाट्याजवळ (ता. पैठण) घडली.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयात ॲड. सतीश मगरे ज्युनियर वकील होते. ते स्कुटीने रविवारी अंबड येथे टिळ्याच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम उरकून घरी छत्रपती संभाजीनगरला परतत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना उडवले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन धडकली. यात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.