छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी (७ जुलै) रात्री नऊच्या सुमारास कामगार कार्यालयाजवळील एसटी वर्कशॉपसमोर घडला. शिरसाट यांच्या पत्नी, कन्या व मुलगा यावेळी गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे.
शिरसाट यांचे कुटुंबीय वरद गणेश मंदिराकडून बाबा पेट्रोलपंप चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी एसटी वर्क शॉपसमोर दोन गटांत भांडण सुरू होते. त्यामुळे शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीचा वेग कमी झाला. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकला. त्यामुळे चालक आणि कुटुंबीय गाडीतून उतरले. त्या वेळी तो दुचाकीस्वार पळून गेला.
गाडीला धक्का लागल्याने थोडा गोंधळ झाला, असे आमदार शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील घटनास्थळी पोहोचले. या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शिरसाट यांच्या स्वीय सहायकाने गाडीवर कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.