छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्याशी युती करण्याचा विषय आता निकाली निघाला आहे. त्यांच्याशी युती होणार नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना दिली.
मनोज जरांगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव मी ठेवला होता, पण विधानसभेच्या २८८ जागा लढविणार, असे त्यांनी जाहीर केल्याने आता त्यांच्याशी युती करण्याचा विषय नाही, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. विधानसभेची रणनीती दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत निर्णय घेऊन ठरवू. मित्र कोण, शत्रूकोण, हेही ठरविले जाईल. उद्धव ठाकरेंसोबतची युती तुटल्यामुळे आता पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचेही ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी राखीव मतदारसंघ सोडून उरलेल्या सर्व जागांवर गरीब मराठे उभे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.