खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी कालच अभिनेता विकी कौशल येऊन गेला. त्याची चर्चा कायम असतानाच आज, ७ फेब्रुवारीला चक्क देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी दुपारी साडेबाराला मंदिरात पाऊल ठेवले. खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले.
जशोदाबेन नरेंद्र मोदी या येण्याआधीच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील चौकातही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस तैनात झाले होते. दुपारी साडेबाराला जशोदाबेन यांनी श्री घृष्णेश्वर मंदिरात येत दर्शन घेतले. अभिषेक व महापूजा केली. यावेळी मंदिर देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरातही संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ यांनी त्यांचे स्वागत केले. श्री घृष्णेश्वर मंदिराच्या व्हिजिट बुकमध्ये जशोदाबेन यांनी अभिप्रायसुद्धा नोंदविला. त्यात त्यांनी हर हर महादेव, बहुत अच्छा लगा, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पिशोर येथील प्रसिद्ध व्यापारी भरत चौधरी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यानिमित्त जशोदाबेन यांचे गुरुवारी मध्यरात्री चौधरी यांच्या घरी आगमन झाले होते. संध्याकाळी त्यांनी चौधरी यांच्या कन्नड येथील मुलीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिला.
