छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांनी यापुढे कोणीही ठाकरे गट सोडून जाणार नसल्याचे दावे केले, पण आज, ७ फेब्रुवारीला हे दावे फोल ठरले. सायंकाळी ठाकरे गटाचे १० माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले. यावेळी खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल उपस्थित होते. मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुक्ताई बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना, ठाकरे गट सोडून माजी नगरसेवक, शहरातील पदाधिकारी भाजप आणि शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यात आज आणखी १० माजी नगरसेवकांची भर पडली. स्थायी समितीचे माजी सभापती मोहन मेघावाले, माजी सभागृह नेता किशोर नागरे, गटनेता मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जयस्वाल, रूपचंद वाघमारे, माजी नगरसेविका स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सपत्नीक शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचवेळी आणखी डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात जातील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र खैरे आणि दानवे यांनी तातडीने माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा फोल ठरला आहे.
खैरे म्हणाले, शिंदे गटातही सुरू झाली गटबाजी..!
दहाही माजी नगरसेवकांनी बदमाशी केली असून, आता यांना पाडून नवीन लोकांना निवडून आणणार आहोत. या लोकांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली होती. तरीही त्यांनी मोठी चूक केली आहे, हे त्यांना येत्या काही दिवसांत कळेलच. शिवसेनेने यांना मोठे केले होते. या लोकांनी लोकसभा व विधानसभेत काहीच काम केले नाही, अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी करत शिंदे गटामध्ये सिरसाट, जैस्वाल आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातही गटबाजी सुरू असल्याचा दावा केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला गैरहजर राहिलेल्या आ. संजय शिरसाट यांनी सांगितले, की माझ्या लग्नाचा वाढदिवस असल्याने मी गेलो नाही. तर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, की यातील काही नगरसेवकांना माझा विरोध होता. त्यांची क्षमता बघून संधी दिली जाईल. आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले, की माझ्या मतदारसंघातील कोणते नगरसेवक शिंदे गटात घ्यायचे याचा निर्णय मी घेणार आहे.