छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयएच्या) अध्यक्षपदी अर्पित सावे, मानद सचिवपदी अथर्वेशराज नंदावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास करण्यावर आणि स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरापर्यंत नेण्यावर भर देऊ. मराठवाड्याला एक भरभराटीचे औद्योगिक केंद्र, असा विश्वास यावेळी नूतन अध्यक्ष अर्पित सावे यांनी व्यक्त केला.
‘सीएमआयए’ २०२४-२५ वर्षाच्या कार्यकारिणीची शनिवारी (६ जुलै) घोषणा करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उत्सव माछर, सहसचिव स्मिता भारतीया, मानद कोषाध्यक्ष मिहीर सौंदलगेकर, सहकोषाध्यक्ष अनुज बन्सल, प्रशासन जनसंपर्क सेल प्रमुखपदी सौरभ छल्लानी, महिला समिती प्रमुख उत्कर्षा पाटील, उद्योग-व्यापार समितीप्रमुख ऋषिकेश जाजू, कौशल्य विकास समिती प्रमुख अंकित काळे, वाळूज झोन प्रमुख जितेंद्र संघवी, ऑरिक झोन प्रमुख ऋषिकेश गवळी आणि मराठवाड्यातील अन्य उद्योग वसाहत झोन प्रमुख रसदीपसिंग चावला यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीने शनिवारी पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ, गुरप्रीतसिंह बग्गा, पॅट्रोन सदस्य रितेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक समितीत अध्यक्ष म्हणून मुनिश शर्मा, सदस्य म्हणून आशिष गर्दे, गुरप्रीतसिंह बग्गा यांनी काम पाहिले.